मी व वांगं

 मी व वांगं 


माझी वांग्याशी तोंड ओळख कधी झाली हे निटस आठवत नाही, पण वांग्याची आठवणारी भेट झाली ती कोल्हापुरात, शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल मध्ये, साधारण जुलै 1983 मध्ये.


त्याच झाल असं, मी M Sc करण्या साठी शिवाजी विद्यापीठात गेलो, हॉस्टेल वर राहू लागलो, मी उप्या, पांड्या, तडया व पोस्ट जोश्या असा तो आमचा 5 जणांचा ग्रुप. सगळे एकत्र असायचो, चहा पाणी जेवण एकत्रच. आम्ही सर्वांनी सकाळी एकच डबा लावला होता, शनिवारची सकाळ वांग्याची असायची, तिथली वांगी खाऊ लागलो, भाजी काळ्या मसाल्यात केलेली असायची, खूप तिखट, मला व इतर चौघाना पण ती खाणे खूप अवघड जात असे. वांग्या बद्दल एक मनस्वी तिरस्कार निर्माण झाला, ती खाल्ली की मला खूप पित्त व्हायचे वगैरे वगैरे .

आयुष्याचे संबंध तोडायचेच ठरवले होते. आणि केलेही तसेच. उप्याने एक शक्कल लढवली, तेंव्हा हॉस्टेल मध्ये काहीजण उपवास करायचे व त्यांना शनिवारी सकाळी खिचडी यायची, एक दिवस उप्याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली व आपण पण उपवास करायचा असे ठरवले व तात्पुरती खुन्नस काढली वांग्यावरची.


ह्या मुळे एक किस्सा झाला, नुसत्या खिचडीवर दिवसभर बसणे जमायचे नाही, मग त्या बरोबर शनिवारी सकाळी प्रत्येकी एक अशी चार अंडी सकाळी खायची असे ठरले (पोस्ट जोश्या अंड खाणार नाही म्हणाला होता). मग चार अंडी सकाळी स्टोव्ह वर उकडली जायची व खिचडी बरोबर खायची असे ठरले, उप्याची रूम आमचे notified kitchen असायचे, एक शनिवारी सकाळी डबेवाला काका डबे घेऊन डायरेक्ट उप्याच्या रूम मध्ये घुसला, बघतो तो अंडी बॉईल होत होती, त्याला संशय आला, तो हटून बसला उपवास नसतो तर खिचडी का, वांगी भाजीचा वकील असल्यासारखा वाद घालू लागला, पण आमचा उप्या, सगळ्या वकिलांचा बाप, त्याने सिद्ध केले, अंडी शाकाहारी असतात व उपासला चालतात हे. जे लोक उप्याला ओळखतात ते कबूल करतील, ह्या बाबतीत त्याचा हातखंडा होता, तर असा आमचा तात्पुरता पंगा झाला होता.


त्यानंतर मी बँकेत लागलो, कुर्डुवाडीला गेलो, तिथे परत वांगी, इथे तर आठवड्यातून तीन चार वेळा, परत तेच तिखट खाऊन पित्त व्हायचे, पण नोकरी होती कोणीतरी सांगितले रोज दही घेत जा, ते भाजी कालवून खात जा, त्रास कमी होईल, उदर भरणं करणे तर आवश्यक होते, वांगी अनिच्छेने खायचो, दोस्ती काही झाली नव्हती पण, तिटकारा होताच पण option नव्हता.


नंतर हळू हळू आजूबाजूला हुरडा खायला जाऊ लागलो, तिथ आगटीमध्ये कणसा बरोबर वांगी पण भाजायचे, ती लोक आवडीने खायचे, सोबत तिखट मीठ लावून, एकदम कोवळी वांगी. मी थोड्याश्या अनिच्छेनेच खायला सुरुवात केली. हळू हळू खायला छान वाटू लागले, पूर्वीचा तिरस्कार कमी होऊ लागला.


1992 साली माझं लग्न स्मिताशी झाले. भाकरी करण व भरली वांगी ह्यात तिचा हातखंडा. त्या काळात मी पण शेळगावला बदलून गेलो होतो. शेळगाव म्हणजे वांग्याच भांडार, छोटी, कोवळी खूप छान वांगी तिथे मिळायची, प्रत्येक शेतकरी थोडी तरी वांगी लावायचाच. गुरुवारच्या बाजारात वांगी इतकी स्वस्त असायची की, एक किलो पेक्षा कमी घेताच यायची नाहीत, एव्हाना भाकरी वांग्याची भाजी व मी असं एकंदरीत चांगल जमायला लागलं होत.


माझी बायकोच एक ऑबसेर्व्हशन आहे, मी कोठेही नव्या ठिकाणी गेलो व पहिल्या आठ दिवसात आमचं वाजलं की तो माणूस माझा आयुष्यभराचा चांगला मित्र होतो, तसंच काहीस माझं वांग्या बरोबर झाल. सोलापूरला असे पर्यंत वांगं माझं जीव की प्राण झाल.


नंतर मी कोकणात गेलो, परत बाहेर जेवण, वांग्याची भाजी. तिथे काळी मोठी वांगी वापरायचे भाजी करायला, फोडीची भाजी, तिथली वांगी बेचव, परत प्रकरण संबंध संपण्या पर्यंत गेलं. पण आठवड्यात एकदा घरी यायचो, रविवारी ताव मारायचो म्हणून संबंध ताणले गेले पण तोडले नाहीत.


नंतर परत पनवेलला गेलो, तिथे छोटी वांगी व भरताची वांगी मिळायची, मग प्रेम वाढत गेलं, युगायुगाचे संबंध वांग्याशी असल्याची जाणीव तिथूनच मला झाली.


आता पण वांगी जर कोणी असे म्हणाले की बेचव असतात, माझ्या मनात त्याच्या बद्दल कीव निर्माण होते.


हल्ली मी भाजी आणायला क्वाचितच जातो, पण जातो तेंव्हा स्मिता आठवणीने सांगते, *वांगी आणू नकात*, तिला माहिती असत ती मी घेऊन येणारच, पण ते सांगितल्याने तिला घरी आल्यावर भांडायला एक base तयार होतो, भाजी आणली, वाद (एकमार्गी) झाले की आतून आवाज येतो, तुमच्या नावाची तीन वांगी करायची की चार, बस हे ऐकलं की जाम गुदगुल्या होतात पोटात.


तर मी गुजरात, बुऱ्हाणपूर, कोकण ह्या ठिकाणी वेग वेगळी वांगी पाहिली. गुजरात मध्ये छोटी हिरवी वांगी मिळायची, त्याला तिथे रिंगन म्हणतात. बुऱ्हाणपूरला मोठी वांगी, साधारण अर्ध्या किलोचे एक वांगं, हिरवेच असायचे, पण त्याच विशिष्ट पद्धतीने केलेले भरीत छान लागायचे, रंग रूप, मसाला सर्व वेगळं, पण मला सगळ्या ठिकाणी जगवलं ते ह्याच भाजीनेच.


मला वांगं बेचव आहे असे कोणी म्हणले की फार वाईट वाटते, त्या पुढच्या सर्व चर्चाच बेचव होऊ लागतात.


तर असा हा भाज्यांचा राजा, ज्याला मुकुट आहे, काटेरी तो बाजारात असतो मात्र रुबाबात.


*"साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जलोटा

Tarrif युद्ध

Melbourne 1